"देहाकडून - देवाकडे" जाताना मध्ये देश लागतो, समाज लागतो आणि जीवन जगत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या विचारांनी प्रेरित होऊन गुजराती शिक्षण संस्थेची 1938 मध्ये स्थापना झाली आणि आजतागायत गुजराती हायस्कूल, गुजराती प्राथमिक शाळा, भानुमती वर्मा बालक मंदिर, गुजराती इंग्लिश मीडियम स्कूल अशा बहारदार वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. मला या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे,की मी या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे.
लहानपणापासून मी या संस्थेचा उत्कर्ष होताना पहात आलो. यामध्ये समाजातील अनेक पदाधिकारी, मान्यवर, शाळेतील कर्मचारी या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे.ज्या संस्थेच्या उत्कर्षात माझ्या वडिलांचा हातभार लागला त्याच संस्थेत मला कार्य करण्याची संधी भेटते याचे मला मनस्वी समाधान आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी देशातच नाहीतर विदेशातही शाळेचे नाव उंचावत आहेत. अनेक उच्च पदावर विराजमान आहेत. प्रत्येक क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे आहे. "शाळेतील प्रत्येक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकलाच पाहिजे" असे मला वाटते. चांगल्या विद्यार्थ्यांना अजून हुशार करता येते परंतु जे अप्रगत आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचा अनुभव मला covid-19 च्या काळात आला. दोन वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकावं लागलं साहजिकच शाळा, शिक्षक व सवंगडी यांच्या संपर्कात विद्यार्थी नसल्यामुळे अभ्यासात मागे पडले. अप्रगत झाले त्यामुळे त्या वर्गाकडे विशेष लक्ष देऊन, दोन शिक्षक एका वर्गासाठी नेमले,पालक भेटी घेतल्या, व या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती घडून आली. याच वेळी माझ्या असं लक्षात आलं की शाळा डिजिटल असणे किती महत्त्वाचे आहे, म्हणून डिजिटल क्लासरूमची संकल्पना प्रत्यक्षात आणली. डिजिटल वर्ग सुरू झाले. यामुळे प्रत्येक विद्यार्थी तंत्रज्ञानाशी जोडला गेला. साहजिकच तंत्रज्ञान प्रवाहाशी जोडला गेला. शाळेची अशीच सदैव प्रगती होत राहो असा मी सदैव प्रयत्न करीत राहील. या शाळेचा विद्यार्थी अभ्यासात थोडाफार कमी असला तरी चालेल पण जीवन प्रवाहात माणूस म्हणून जगला पाहिजे. संस्कारक्षम कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून त्यांनी समाजात स्थान निर्माण केलं पाहिजे, अशी मी आशा व्यक्त करतो. गुजराती प्राथमिक शाळेच्या रुपाने 1938 मध्ये लावलेल्या इवल्याशा रोपट्याने आज एका विशाल वटवृक्षाचे रूप धारण केलेले असताना, गुजराती शिक्षण संस्थेच्या शाखांचा विस्तार करण्याचे माझ्या कार्यकारणीचे धोरण आहे. त्यासाठीच नंदिग्राम सोसायटी येथील पाच एकर जागेत भव्य शालेय परिसर विकसित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. लवकरच खास पालकांच्या मागणीवरून गुजराती शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या विविध शाखा देखील सुरू करण्याचा गुजराती शिक्षण संस्थेचा मानस आहे. गुजराती शिक्षण संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील यात शंकाच नाही. यामध्ये शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. चला आपण सर्व मिळून या संस्थेच्या विकासाचा विचार करू.
|| शिक्षणाचा अमृत कलश
घेतला आम्ही हाती,
सदैव होत राहो
गुजराती शिक्षण संस्थेची प्रगती ||