गुजराती हायस्कूलच्या ईशान बासरकर ची राष्ट्रीय संघात निवड
नेपाळमधील पोखरा येथे होणाऱ्या इंडो-नेपाल टी ट्वेण्टी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा सुपूत्र ईशान अनंत बासरकर याची भारतीय अ संघात निवड करण्यात आली आहे. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान नेपाळ येथे या स्पर्धा होणार आहेत.
ईशान हा नांदेडमधील गुजराती हायस्कूलला आठवीत शिकत आहे. टी- २० क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने त्याला उपरोक्त संघात निवड झाल्याचे लेखी पत्र पाठविले आहे. यापूर्वी ऑल इंडिया टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची आता भारतीय अ संघात निवड झाली आहे. ईशानला लहानपणापासूनच क्रिकेटचीआवड आहे. शालेयस्तरावर विविध स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवून चमक दाखवली आहे. टी-२० क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी भारतीय अ संघात निवड झालेला तो नांदेड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
संघात निवड झाल्याचे पत्र टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी अक्षय पाराशर यांनी पाठवले आहे. ईशान हा नांदेड येथील मिताली क्रिकेट अकॅडमीचा विद्यार्थी आहे. प्रशिक्षक नंदू पाटील कृष्णुरे, मुख्याध्यापक आर.एस. सुमठाणकर, क्रीडा शिक्षक संजय नाईक, सौ. सीमा जोशी, व्ही. एस. मोरे, आई सौ. अर्चना, वडिल अनंत बासरकर, बासरकर परिवार, मित्रमंडळाच्या सदिच्छेमुळे आपली निवड झाल्याचे इशानने सांगितले.